उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक
आजच्या बदललेल्या वेगवान जीवनशैलीत आहार, व्यायाम, करमणुकीची साधने, ध्वनीप्रदूषण, ताणतणाव अशा बदलांमुळे बहुसंख्यांच्या झोपेवर परिणाम झाले आहेत.
आहारामधील जंकफूड, कॅफीनयुक्त पेये, एनर्जी ड्रिंक्स, चहा-कॉफीचे वाढते प्रमाण, पार्ट्या-समारंभांमध्ये आणि मित्रमैत्रीणींसोबतच्या भोजन समारंभांमध्ये होणारे अतिरिक्त मद्यपान या सगळ्यामुळे उत्तम झोप येण्यावर मर्यादा आल्या आहेत.
कामाचे तास अनिर्बंध झाल्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये येण्या-जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी वाहनेच वापरल्यामुळे जवळच्या अंतरावर चालत जाण्याची शारीरिक हालचाल टाळली जाते. जिन्यांवरील चढउतार टाळण्यासाठी लिफ्ट आणि सरकते जिने वापरले जातात. शरीराची हालचाल मर्यादित झाल्यामुळे, शारीरिक थकव्यामुळे 'झोप येणे' हा अनुभव येणे संपुष्टात आले आहे.
दैनंदिन व्यवहारात आणि करमणुकीच्या साधनांमध्ये संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रेलचेल आहे. मोबाईल फोन, टेलिव्हिजन, संगणक, लॅपटॉप, टॅब्ज यांचा वापर छोट्या मुलांपासून जख्ख वृद्धांपर्यंत सर्रास होत आहे. या उपकरणांमधील किरणोत्सर्गाचा परिणाम शरीरात झोप आणणाऱ्या मेलॅटॉनिनसारख्या हार्मोनवर होऊन, उशीरा झोपण्याचे प्रमाण वाढले आहे.
काही वेळेस, आधुनिक जीवनाचा हा सुसाट वेग, थोडेसे थांबण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वेळच देत नाही. त्यामुळे नियमितपणे शांत-निवांत झोप मिळणे हे दुर्लभ स्वप्नासारखे वाटायला लागते. पण उत्तम आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची असते.
उत्तम झोप मिळाल्याने मेंदूची कार्यक्षमता, मनाचा मूड आणि शरीराचे आरोग्य सुधारते. मात्र पुरेशी, दर्जेदार आणि नियमितपणे झोप मिळाली नाही, तर अनेक आजार आणि विकारांचा धोका वाढतो. या आजारांच्या यादीत हृदयविकार, अर्धांगवायूपासून ते लठ्ठपणा आणि स्मृतिभ्रंशापर्यंत अनेक गंभीर आजारांचा समावेश होतो.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा